December 12, 2007

स्ट्रेस बस्टर

स्ट्रेस’ हा शब्द आपण आजकाल सर्रास वापरतो, नाही? ’स्ट्रेस, टेन्शन, मानसिक अस्वास्थ्य’ वगैरे.. सगळ्याचा अर्थ एकच.. वेगाने पळणार्‍या आयुष्यामुळे होणारे मनस्ताप, ऑफिसमधे, घरामधे निर्माण होणार्‍या समस्या, त्यामुळे डोक्यात अनावश्यक विचारांची गर्दी, त्यामुळे मनात निर्माण झालेले सुमारे पन्नास-शंभर प्रश्न, त्यांना न सापडलेली, किंवा मिळालेली असली तरी फारशी समाधानकारक नसलेली उत्तरं, त्यामुळे अजूनच वाढलेलं ’कन्फ्यूजन’.. आणि मेंदूचा टोटल राडा! आपला छोटासा मेंदू बिचारा ’स्ट्रेस’ होणार नाही तर काय?

मग ओघानी आलेच.. त्या स्ट्रेसला ’डीस्ट्रेस’ करायचे उपाय. ’योगा’ हा सध्याचा ’लेटेस्ट इन-थिंग स्ट्रेसबस्टर’ आहे हं. तसंच ’हास्यक्लब’चा फंडा पण खूप लोकप्रिय होत आहे. लोक निखळ, मनमोकळं हसायला दुर्दैवानी विसरले आहेत, त्यामुळे कृत्रिम का होईना, पण जीवनात हसू आणून तो ’स्ट्रेस’ थोडा कमी करायचा प्रयत्न करायचा. तसंच, सकाळी सकाळी ’मॉर्निंगवॉक’ ला जाणं, पळायला जाणं, संध्याकाळी टेकडीवर फिरायला जाणं... व्यक्ति तश्या प्रकृति, त्यामुळे प्रकृतिनुसार, तब्येतीला झेपतील, आवडतील असा मनावरचा ताण घालवायचा एखादा तरी प्रकार प्रत्येक व्यक्ति अनुसरते.

जगरहाटीनुसार मलाही येतोच की स्ट्रेस. डोक्याचं विचार करकरून पार भजं होतं. कळत असतं हं की हे सगळे विचार अनावश्यक आहेत, नकोयत हे आपल्याला, हे विचार कारण नसताना आपली झोप उडवत आहेत.. पण हे सगळं माहित असूनही त्या निगेटिव्ह विचारांवर मी नियंत्रण नाही आणू शकत. ते गर्दी करतातच डोक्यात. आणि मग माझी मानसिक अवस्था हळूहळू खालावत जाते. ’मी या जगातली सर्वात क्षूद्र व्यक्ति आहे, माझ्या हातून काहीही धड होऊ शकत नाही, काम जमत नाही, घर सांभाळता येत नाही, अवांतर वाचन नाही, तब्येत ठीक नाही..’ अगदी वाट्टेल त्या थरापर्यंत मन भटकून येतं. बरं, जात्याच आळशी असल्याकारणानी मी रोज काही फिरायला, व्यायामाला वगैरे जात नाही. त्यामुळे हा स्ट्रेस बिचारा माझ्या डोक्यात जागा मिळेल तिथे साचतच जातो. मग हळूहळू मानसिक अवस्था तळागाळाला जाते, एकदम ’रॉक बॉटम’च! आणि अशी एकदाची निचांकी पातळी गाठली गेली की अचानक कुठूनतरी संदेश येतो की ’बास आता. बक अप. आपण काही इतके गएगुजरे पण नाही. या स्टेजमधून बाहेर आलं पाहिजे.’ कसं? माझ्याकडे उपाय आहे ना, पण अगदी वेगळा आहे, तुम्हाला तो चमत्कारिकही वाटेल कदाचित.. पण माझ्यासाठी तो जालिम उपाय आहे खरा.

मी तडक गाठते ते ’ब्यूटीपार्लर’! तेही अपॉईंटमेन्ट वगैरे न घेता. एकदम धडक मोहीम.. नीचांकी पातळी कधी गाठली जाईल याचा नेम नसतो, साधारण दिड ते दोन महिने लागतात. पण त्यामुळे होतं काय, की अपॉईंटमेन्ट घेणं शक्य नसतं. मी तर मनात आलं की धाडकन अवतीर्णच होते तिथे. असो!

तर ब्यूटीपार्लरमधे पाऊल ठेवल्या ठेवल्या तिथली स्वागतिका गोड हसून स्वागत करते. नम्रपणे विचारते, "काय करायचंय?" उत्तर दिल्यानंतर पुन्हा तश्याच गोड आवाजात म्हणते, "एक मिनिट हं" आणि मग योग्य त्या ’डिपार्टमेन्ट’ कडून खातरजमा करून मला किती वेळ थांबायला लागेल याची कल्पना अगदी दिलगिरीयुक्त आवाजात देते. बास! इथेच माझा निम्मा शीण पळून जातो. इतकं गोड बोलणं, इतकं अदबीनं वागणं.. कल्पनातीत असतं हो माझ्यासारख्या सामान्य स्त्रीला. मग मी त्या स्वागतकक्षात बसते, नाही नाही, स्थानापन्न होते! तिथे माझ्यासारख्याच बायका, मुली आपापल्या नंबरची वाट पहात असतात. तिथेच पडलेल्या एका तद्दन फिल्मी मासिकाच्या आड चेहरा लपवून मी त्यांचं उगाचच निरिक्षण करते आणि त्यांच्या रंगरूपाला नाक मुरडते- अर्थात मनातल्यामनातच. (दुसर्‍याला हीन लेखणं हाही एक स्ट्रेसबस्टरच आहे बरंका!) एवढं होईपर्यंत मला पुष्कळच बरं वाटायला लागलेलं असतं.

अजून थोडा वेळ शांततेत गेल्यानंतर मला माझ्या ’डिपार्टमेन्ट’ मधे बोलावणं येतं. तिथे किमान दोन मुली माझ्या दिमतीला असतात. त्यांच्या ताब्यात मी माझा चेहरा, हात, पाय देते. त्या मन लावून त्यांना सांगितलेलं काम करतात. एकमेकींचे सल्ले घेतात, आपसात चर्चा करतात- ’मला सुंदर करण्यासाठी त्या किती कष्ट घेत आहेत’ असा विचार करून मी मनातल्यामनात धन्य होते. पण तसं न दाखवता मी एक विचारी चेहरा धारण करते आणि त्यांना माझ्या बहुमोल सूचना देते. त्या मुली त्या सूचना ’सर-आँखोंपर’ वगैरे घेत माझ्या अपेक्षा पूर्ण करायच्या मागे लागतात. माझ्या मताला कोणीतरी इतकी किंमत देतंय, माझ्या सूचनाबरहुकुमच काम होतंय.. याची एरवी मला सवय नसल्यामुळे माझं मन समाधानानी काठोकाठ भरतं. हा एक-दीड तास तरी अगदी ’रॉयल’ जातो. डोक्याला थंडावा देणारा मसाज होतो, चेहर्‍यावरच्या ’स्ट्रेसलाईन्स’ काढल्या जातात, हात-पाय तजेलदार दिसायला लागतात.. आईशप्पथ, फार मस्त वाटतं!

मग एकदाचं त्यांचं समाधान झालं की त्या मला पुन्हा त्याच गोड आणि नम्र आवाजात म्हणतात, "बघा मॅडम, ठीक आहे?" मग मी पुन्हा पुन्हा स्वत:ला निरखते आणि मग खडूसपणे, शक्य तितका आखूड हुंकार देते. त्या बिचार्‍या, त्यातही समाधान मानतात आणि आवराआवरीला लागतात. आत्तापर्यंत मी ’टोटली स्ट्रेस-फ्री’ झालेली असते.. मन उल्हसित वगैरे झालेलं असतं, ’तू सुंदर दिसत आहेस’ हे नुकतीच पर्स मधून गेलेली तीन आकडी नोट सांगत असते, निघता निघता ’कम अगेन’ असं ती स्वागतिका पुन्हा हसून म्हणते आणि मला सूचित करते की ’तुम्ही आम्हाला हव्याहव्याश्या आहात’! बस, और क्या चाहिये?

तरंगतच मी घरी पोचते. अत्यंत उत्साहानी नवर्‍याला विचारते, ’मी कशी दिसतीये?’
तो मला सुमारे दहा सेकंद अगदी व्यवस्थित टक लावून बघतो आणि म्हणतो, ’आज काय विशेष? तू नेहेमीच सुंदर दिसतेस मला.’
मी नुकतीच ’स्ट्रेस-फ्री’ झाल्यामुळे यातली खोच माझ्या लगेच लक्षात येत नाही. उलट मी अजूनच खुश होते. गुणगुणायला सुद्धा लागते चक्क!

कालांतराने ती खोच येते माझ्या लक्षात. ’मी कशीही दिसले तरी याला काहीच फरक पडत नाही’ अश्यासारखे निराशाजनक विचार यायला अजून साधारण एक महिना जातो. तोवर बाकी नकारात्मक विचारही प्रवेशकर्ते झालेले असतात. कुठेतरी काहीतरी बिनसलेलं असतं, मानापमान झडलेले असतात, डोक्यावर कसलं ना कसलं टेन्शन असतंच.. पुन्हा तेच चक्र सुरु होतं- विचार, विचार आणि विचार!!

आणि मग पुन्हा येते ती वेळ- स्ट्रेस-फ्री व्हायची! ब्यूटीपार्लर गाठायची!!

7 comments:

सर्किट said...

सही जमलंय हे पोस्ट! तुम्हा बायकांचा स्ट्रेस-बर्स्ट करण्याचा हा इतका सोपा उपाय आम्हाला मात्र करून पहाणंही शक्य नाही याचं वाईट वाटतं! मागे ट्युलिपनेही जर्मनीत करवून घेतलेल्या पेडीक्युअर्स बद्दल अगदी नोस्टॅल्जिक होवून लिहीलेलं..

तुमच्या मानाने आमचे स्ट्रेस-बर्स्ट करण्य़ाचे प्रयत्न तसे तापदायकच म्हणायचे. (reference: my post titled 'bloody thin line')

बाकी हे एकूणच वर्णन अफ़लातून जमलंय! :-)

माझी दुनिया said...

"(दुसर्‍याला हीन लेखणं हाही एक स्ट्रेसबस्टरच आहे बरंका!)

मग खडूसपणे, शक्य तितका आखूड हुंकार देते.

यातली खोच माझ्या लगेच लक्षात येत नाही"

सहीच लेख. मलाही असं नैराश्य ब-याचदा येतं. पण हा उपाय कधी करून पाहीला नव्हता. आता टीप मिळालेयं तर करून पहायलाच हवा.

Abhijit Dharmadhikari said...

chhan lihilay post:-) ata me pan stress aalyawar salon madhye jaycha wichar kareen....tel malish/champi:-)

Shraddha said...

अगदी अगदी पूनम. माझाही तोच stress burster आहे. किंबहुना, पार्लरपेक्षाही स्पा. आहाहाहाहा..... ते मंद दिवे, अरोमा कँडल्स, काचेची पात्रं त्यात फुलं. आपल्याला डिस्टर्ब होऊ नये म्हणून त्या स्पा सेविका पण एकदम हळू आवाजात बोलतात.
मग छानपैकी अरोमा ऑईल्सचा मसाज, स्टीम...... ह्म्म्म्म्म्म्म्म्म.... जायला हवं आता. :-P

Tulip said...

arre waa.. he vachalach navat mi. spa beauty parlers pedi vagaire ahech pan shopping kas visarlis tu? shopping shopping... great stress buster. rather shopping la nimitt mhanun stress odhavun ghete mi baryachda:)))

स्नेहल said...

hahaha....
mast lihila aahes :) itakyaat janaar aahes ka mag parlour madhye??

ships09 said...

hey, nice post!!!
I can relate to thee feeling :)
I read all ur stories too. You have a good flavour of writting.
Looking forward to read more from you.
Love
Shilpa