December 4, 2007

आई!

नुकतीच आठ दिवसांचं माहेरपण संपवून घरी आले परत. निघताना नेहेमीप्रमाणेच घशात काहीतरी अडकल्यासारखं झालं, रडू येत होतं, ’संपलं माहेरपण, आता पुन्हा सुरु’ सारखं काहीतरी उगाचच वाटत होतं. वास्तविक माझं सासर-माहेर एकाच गावात- अगदी मोजायचंच झालं तर केवळ पाच किलोमीटरवर.. मी मनात आणलं तर अर्ध्या तासात बॅग भरून आईकडे मुक्कामाला येऊ शकते.. कधीही. फोन तर चालू असतातच. अडीअडचणीला आईची मदत असतेच. आई इतकी accessible असूनही तिच्याकडे रहायला आल्यानंतर परत जाताना रडायला येतंच. लग्नाला इतकी वर्ष झाली तरीही..

काय जादू असते त्या माहेरात? त्या वातावरणात? त्या जागेमधे? तर, तिथे ’आई’ असते!! मला अगदी मनापासून वाटतं की घराला घरपण जसं तिथल्या करत्या स्त्री मुळे येतं, तसं माहेराला माहेरपण आईमुळे येतं. तिचं तिथे असणंच खूप दिलासा देणारं असतं. माहेर म्हणलं की आई हवीच. तसंही कोणत्याही विवाहित बाईला माहेरची ओढ असतेच, पण ती टिकून रहाते ती आईमुळे. जितकी ओढ पंचविशीतल्या मुलीला असते, अगदी तितकीच ओढ साठीतल्या बाईलाही आपल्या ऐंशी वर्षाच्या आईबद्दल असते. ’आई गेली की माहेर संपलं’ असं माझ्या ओळखीच्या एक आजीबाई म्हणायचा, आणि ते मला मनापासून पटतं. आईचा अकृत्रिम स्नेह, तिचं नुसतं असणंच इतकं दिलासादायक असतं की ’माहेरी जायचं’ या कल्पनेनीच नवीन उभारी मिळते.

वास्तविक माझे आणि माझ्या आईचे चिकार मतभेद होतात, आमच्या आवडीनिवडीत फरक आहे, शाब्दिक चकमकी तर नित्याच्याच. तरीपण मला आई लागते! अगदी अजूनही. नवीन केलेली प्रत्येक गोष्ट, किरकोळपासून मोठी खरेदी, मनातले प्लॅन्स, ऑफिसातल्या घटना, मैत्रिणींबरोबरच्या गप्पा, तब्येतीच्या तक्रारी.. सगळं सगळं ऐकवण्याचं माझं हक्काचं स्थान आहे ते. तिचे सल्ले तर पदोपदी मला लागतातच.. मी ते ऐकेनच असं नाही, पण लागतात मला. तिच्या मताचं महत्त्व खूपच असतं माझ्या फायनल निर्णयामधे.

आई आणि मुलांमधे किती सहज नातं असतं ना? ती किती करत असते सतत आपल्या मुलांसाठी.. आणि अगदी सहजपणे. त्यात कसला अभिनिवेष नसतो, ना कसला आव. अगदी नैसर्गिक. मुलांवर आलेलं प्रत्येक संकट, त्यांना भेडसावणारा प्रत्येक छोटा-मोठा प्रश्न, त्यांना त्रास देणारी प्रत्येक बारीकसारिक गोष्ट ही जणू आपली स्वत:चीच असल्याप्रमाणे आई ती निस्तरायला, सावरायला पुढे येतेच. आपण तिच्या मदतही मागितलेली नसते, तोवर तिचा हात पुढे आलेलाही असतो! मुलं तिच्यावर अवलंबून असतात तेव्हा, आणि ती सक्षम झाली, स्वतंत्र झाली तरीही हा आधार असतोच. मला तर कित्येक वेळा आईशी नुसतं बोललं, अगदी साध्या शिळोप्याच्या गप्पा मारल्या तरी खूप बरं वाटतं.

खरं तर आपण सगळेच आपापल्या आईला इतकं गृहित धरत असतो की ’आई’बद्दल असा वेगळा विचार कधी करत नाही. मी तरी नव्हता केला कधी.. मग आजच हे सगळं असं लिहून काढावसं का वाटलं? तर.. गेल्या काही दिवसात फार वाईट बातम्या ऐकल्या काही. दोन मैत्रिणींना त्यांच्या आईला कायमचा निरोप द्यावा लागला. माझी एक नणंद अचानक गेली, तिचा तर मुलगा अवघा १२ वर्षाचा आहे.. पुन्हा एकदा जाणवलं की जीवन किती क्षणभंगूर आहे.. कित्येक लोक आपल्याला भेटत असतात, मदत करत असतात.. त्यांना आपण सहजपणे thank you म्हणून जातो.. पण आपलं सर्वात जवळचं, सर्वात पहिलं नातं- आईचं.. तिला किती वेळा आपण साधं acknowledge ही करत नाही.. अगणित कष्ट, खस्ता, चिंता वहात असते बिचारी आपल्या मुलांच्या, आणि काही अपेक्षाही ठेवत नाही.. उलट मला खात्री आहे- हे असलं काही बोललेलंदेखील आवडणार नाही तिला.. ’त्यात काय विशेष?’ ’ते आपोआप होतं, काही वेगळं करावं लागत नाही त्याला’ असंच म्हणेल ती. तरी पण.. राहवत नाही..

आत्तापर्यंत आईने कधीच मला काही मागितलं नाही, कायम दिलंच आहे.. आणि आई, पुन्हा एकदा मी मागतच आहे तुझ्याकडे.. तुझ्या मायेची पाखर, तुझ्या अव्यक्त प्रेमाची ऊब, तुझ्या स्पर्शातला दिलासा, तुझ्या शब्दातली आपुलकी.. हे सगळं सगळं मला हवंय..आणि खूप खूप हवंय..

14 comments:

Kamini Phadnis Kembhavi said...

या अख्या लेखाला सलाम,

पण नको असा विचार करुस ग......
रडवलस परत :(

सर्किट said...

गुड पोस्ट! व्हेरी सेण्टी..
पोस्ट वाचताना वपुंच्या पार्टनर मधला नायक आठवत होता - त्याला बिचाऱ्याला तर त्याच्यावर निखळ प्रेम करणारी आई सुद्धा मिळालेली नसते!
आपण त्याच्यापेक्षा कितीतरी भाग्यवान म्हणायचो मग!

स्नेहल said...

poonam...sundar utaralyaa aahet bhaavana!!!

yaach print out gheun aai la wachayala de :)

Monsieur K said...

kharach khup chhaan lihila aahe.
snehal mhante tasa, ek printout kaadhun aai la dey vaachaaylaa.
’त्यात काय विशेष?’ ’ते आपोआप होतं, काही वेगळं करावं लागत नाही त्याला’ असंच म्हणेल ती. तरी पण..

Tatyaa.. said...

आज अचानक हा लेख वाचनात आला. सुंदर लिहिला आहे..

असो, पुढील लेखनाकरता अनेकोत्तम शुभेच्छा!

तात्या अभ्यंकर.
http://www.misalpav.com/

Abhijit Dharmadhikari said...

Ekdam chhan lihilay..sunder!

पूनम छत्रे said...

सर्वांचे खूप खूप धन्यवाद.. विषयच असा होता की आपोआप लिहिता लिहिता सेन्टी झाले :) आणि मग एडीट करवलं नाही! :)

ब्लॉग तुम्हाला आवडला, आवर्जून तसं कळवलंत- मनापासून आभारी आहे :) असाच लोभ ठेवा :)

vivek said...

ह्र्दयस्पर्शी लेख. "पुरुषांना काय कळणार माहेरपणाची किंमत" असं पण म्हणू शकत नाही तुझा लेख वाचल्यावर, कारण भावना पूर्णपणे पोचल्या

संदीप चित्रे said...

अभिनेता अमजद खानची आई गेली तेव्हा त्याने डायरीत प्रेषित मोझेसची कथा लिहून ठेवली. असं म्हणतात की मोझेस रोज टेकडीवर जाऊन देवांशी संवाद करायचा. मोझेसची आई गेली आणि तो रोजच्यासारखा देवांशी संवाद करायला टेकडीवर गेला. आज तो काही म्हणायच्या आधी देवच म्हणाला, “थांब ! जपून बोल, विचार करून बोल. कारण ह्यापुढे तुझ्या चुका सांभाळून घ्यायला तुझी आई आता नाही.” संदर्भ – ’माझी फिल्लमबाजी” (शिरीष कणेकर)

Anonymous said...

chhan zala aahe, sarvanchya bhavana eka lekhnitun utarlyat.


lekhachi bhavnik kinar hrudayala chataka lavun jate.

मिलिंद छत्रे said...

poonam kharech chaan lihiles. Dolyaat paani aale

Unknown said...

chaan lihalas

Unknown said...

chaan lihalas

Unknown said...

maz pan aataach 1 varshapurvi lagna zala.mala aaichi every moment la aathvan yete .tuzya ya lekha ne june divas pudhe yeun ubhe rahile

thanks