September 10, 2007

प्रथम तुज पाहता..(१)

--१--

पौर्णिमेची सुंदर रात्र होती.. टिपूर चांदणं पडलं होतं.. चंद्र आत्ता दिसत नव्हता.. पण थोडं वर गेल्यावर दिसला असता.. अजिंक्य वर जायला उतावीळ झाला होता.. अश्या चंद्राचे फोटो कसले अप्रतिम आले असते! निरभ्र आकाश आणि पूर्ण चंद्र.. वा.. अजून काय हवं होतं?? ही शेवटची बॅच एकदाची वर पोचवली की तो मनसोक्त भटकणार होता.. त्या आधी अर्थातच पक्याचा रस्सा होताच.. मस्त वास यायला लागले होते.. यांनी सुरु केलेला दिसतो स्वयंपाक.. चला कामाला लागू..
मार्तंडगडाच्या** शेवटच्या चढाईमार्गावर होते ते.. हाच टप्पा जरासा कठीण होता.. कठीण म्हणजे काय, तर पाय firmly ठेवायला जागा नव्हती, दगड नव्हते आणि धरायलाही काही नव्हते.. दोराच्या सहाय्यानी चढायचे होते.. सर्वात आधी पक्या आणि आशू चढले होते.. त्यांनी दोर सोडले होते. एकूण २० जण होते ते.. ते नेहेमीचे ५-६ जण, बाकी असेच एकेकाच्या ओळखीचे, भाऊ, बहिणी, मित्र, मैत्रीणी असे.. मार्तंडगडाला आधीही आला होता तो.. एकदा धोधो पाऊस होता. तेव्हा हा टप्पा चढताना काय तंतरली होती त्यांची.. शेवटी वळसा घालून safe वाटेनी चढावे लागले होते. मग पुन्हा ईर्षेनी दुसर्‍या वेळी दोराच्या सहाय्यानी चढले होते आणि आज हा ग्रूप घेऊन आले होते. नाही म्हणले तरी सगळे वर धड पोचेपर्यंत टेंशन होतेच. साधारण १५ फ़ूटांची खडी चडण होती.. लक्ष देऊन चढलं तर सोपं होतं.. खाली पहायचं नाही आणि भिती बाळगायची नाही ही दोन पथ्य पाळायला लागणार होती.. त्याने त्याच्याबरोबरच्या ५ जणांना कल्पना दिली कसे चढायचे ते आणि तो दोराला धरून थोडा वर चढला आणि तिथे उभा राहून एकेकाला वर यायला मदत करायला लागला..
"चल, अमित ये तू.. घट्ट धर आणि ये.. हं.. बरोबर.. शाबास.. जमतय की.. या.. पोचलात की.. पळा वर आता.. पल्लवी ये तू आता.. घाबरतेस काय.. अमित कसा गेला बघ टणाटणा उड्या मारत.. चल. " असं करत करत अमित, पल्लवी, प्रसाद, नितेश चढले.. आता उरली ऋजुता.. ती मगाचपासून आढेवेढे घेत होती.. घाबरली होती हे चेहेर्‍यावरूनच दिसत होते! अजिंक्य तिला बघतच राहिला काही वेळ.. हे तिला पाहिल्यापासूनच होत होतं त्याला.. पण आत्ता ते सगळे विचार झटकले त्याने.. आत्ता नीट वर पोचणं महत्त्वाचं होतं..
"ऋजुता, अगं चल ना.. धर तो दोर हातात.. मी आहे ना इथे.."
"मला भिती वाटत्ये.." एक छोटा आवाज, थोडा रडकाही..
"अगं घाबरायचे काय त्यात.. हा इतका मोठ गड चढलीस ना.. आता हे १० फ़ूट तर अंतर आहे.. चल, उचल पाय.."
"मी पडले तर.."
"अगं पडशील कशी? मी आहे ना.."
"तू वर आहेस.. मी खाली पडीन ना पडले तर.." ऋजुता चिडलीच.. आणि अजिंक्यला हसूच आलं एकदम! पॉईंट valid होता तिचा.. "हसतोस काय.. इथे वाट लागली माझी.. मनूच्या नादाला लागून आले मी.. मला आवडत नाहीत हे ट्रेकबिक.. उगाच धाकधुक सारखी.. हिला येता येणार नव्हतं ना या ट्रेकला म्हणून मला आणलं हिने, मगच आई हो म्हणली तिची.. ही गेली शहाणी पुढे आणि मला ठेवलन मागे.." असं झालं होतं होय! मनू म्हणजे ग्रेटच होती.. एकदम टॉमबॉय.. यांच्या ट्रेकची कायमची मैत्रिण.. पण तिच ठरलं होतं लग्न आणि साखरपुडा होता १०च दिवसांनी. मॅडम नंतर उडणार होत्या अमेरिकेला, त्यामुळे तिला हा ट्रेक करायचाच होता.. त्यासाठी तिने ऋजुताला हाताशी धरले होते वाटते.. "मी हे असले ट्रेक कधीच केले नाहियेत रे.. कसला चढ आहे हा.. आयुष्यात पर्वतीखेरीज काही चढले नाहिये मी.. मला नाही येणार चढता.. मी थांबते इथेच.."
पर्वती!! अजिंक्यनी डोक्याला हात लावला!! त्याला आवडायलाच लागलं तिचं बोलणं.. काय सीन होता.. एका चढावर, एकमेकांपासून १० फ़ूट अंतरावर अवघडलेल्या स्थितीत उभे होते ते.. तरीही असंच तिच्याशी बोलत रहायला आवडलं असतं त्याला.. पण म्हणून पर्वती????!!!!
"तू पर्वतीच्या एकमेव अनुभवावर मार्तंडगडाला आलीयेस! काय मॅड आहेस! का महान म्हणू! मनूसाठी इतके कष्ट घेतल्याबद्दल.. या मनूलाही काही कळत नाही आणि.. लग्न करायला निघालीये बावळट.." "तिला बोलू हं नकोस काही.. आता लांब जाणार ती किती.."
"ए प्लीज.. त्या शहाणीनी तुला इथे आणलं म्हणून हे सगळं झालं असं तूच म्हणालीस.. वर तिला बोलायचं पण नाही काही.. अजबच आहेस! बर आता रडूबिडू नकोस.. वर ये आधी.."
"पण मी कशी.. नको.." अजिंक्यचं मन वेगळच काही सांगत होतं, पण डोक्यानी पुढाकार घेतला.. "हे बघ तू आणि मी सोडून सगळे वर पोचलेत. आपल्याला भूक लागली आहे, आपण दमलो आहोत.. आपण तिथे पोचलो नाही तर काळजीनी हैराण होतील सगळे, हो की नाही? आणि बाकी सगळे चढलेच ना? थांब मी येतो खाली, आपण दोघेही चढू, ओके?" असं म्हणत अजिंक्य दोरीनी खाली उतरला. त्याने तिला आधी पुढे व्हायला सांगीतले.. हो, पडली बिडली तर या वेळी होता तो तिच्यामागे! हा पण इतका आपल्यासाठी करतोय म्हणल्यावर ऋजुतानीही मनाची तयारी केली आणि ते हळुहळू नीट वर पोचले.
"शाब्बास.. बघ, सोप्पं होतं ना?"
"सोप्पं!" नुस्तेच डोळे मोठे करून ऋजुता चालायला लागली.. अजिंक्यला मनापासून हसायला आलं. कसली सही होती ही ऋजु.. पण तो चंद्र तिकडे out of focus जायला लागला होता ना.. पक्याला सांगून तो निघालाच कॅमेरा घेऊन.. पक्यानी तेवढ्यात चोंबडेपणा करत "उशीर का झाला", "हंऽऽऽ", "चालूदे" असे रीमार्क टाकलेच, पण अजिंक्यनी दुर्लक्ष केल्यासारखे केले आणि तो सटकला..
वॉव.. काय सही वाटत होतं.. पूर्ण चंद्रबिंब समोरच होत.. चंद्राचं भयंकर attraction होतं त्याला लहानपणापासूनच.. आत्ता ढग नव्हते, निरभ्र आकाश, सुखद गारवा, लांबचे आवाज सोडले तर एक मस्त शांतता.. आणि टिपूर चांदणं! आहा! अजिंक्य फोटो काढायचे विसरलाच.. चंद्राकडे पहात बसला.. अचानक मगाचचे ऋजुता बरोबरचे क्षण त्याला आठवायला लागले पुन्हा आणि तो त्यात पाऽऽऽऽर हरवून गेला.. 'प्रथम तुज पाहता.. जीव वेडावला..' गुणगुणायला लागला.. आयला.. हे गाणं आत्ता आठवावं? पुन्हा एकदा सगळे विचार झटकून त्याने फोटो काढायला सुरुवात केली.. मस्त स्नॅप्स मिळाले काही.. camera च्या night mode मधे काही experiments केले त्यानी आणि त्याचा लाडका चंद्र capture केला..

"या फोटोग्राफेर.. आज तुम्हाला बरीच प्रेक्षणीय स्थळं मिळाली".. पक्याच, अजून कोण!
"गप की साल्या.. फोटोंच्या मागे नंतर कशाला लागतोस मग?" अजिंक्यला कळले पक्या कशाला रेफ़र करतोय ते, पण त्यानी विषय वळवला.. "सगळं खाल्लत का? माझ्यासाठी काही ठेवलत की नाही? अश्या वेळी माझी आठवण येणार नाही तुम्हाला.."
"ओ थांबा थांबा.. भरपूर रस्सा ठेवलाय.. गीळ पाहिजे तितका.. आणि काही लोक पण थांबलेत म्हणे.. बरंय बाबा काही लोकांचं....
" अं?" अजिंक्यला समजले नाही.. पक्यानी मानेनीच निर्देश केला.. ऋजुता आणि मनू थांबल्या होत्या.. आयला.. अजि खुश एकदम.. पण मनू कशाला थांबली? एक नंबर गधडी आहे.. श्या.. पण बरी भेटली.. जरा तासायला हवे होतेच तिला.. पण ऋजुला आवडले नसते.. (अं? ऋजुला आवडले नसते म्हणून आपण मनूला बोलत नाहियोत काही? हे काय आहे काय यार?)
"अरे, थांबलात कशाला तुम्ही?"
"म्हणजे काय, तू माझ्या मैत्रिणीला नीट वर आणलेस.. thanks अजि.."
"आता काय करणार.. तू तिला 'वर पोचवायलाच' निघाली होतीस ना.."
"सॉरी रे.. माझ्या लक्षातच नाही आलं, की हिला जड जाईल ही शेवटची चढण.. मी आले पटकन वर पक्याला मदत करायला.. मग लक्षात आलं, पण म्हणलं तू आहेसच ना.."
"हे बरंय.. लावा मस्का.. ही रडायलाच आली होती तिकडे.. मला टेंशन!"
"रडत नव्हते हं.. उगाच काय!"
"तेच ते, रडायच्या बेतात होतीसच की.. मी नसतो तर.."
"हो खरच.. तू नसतास तर.." अरे! अजिला हे expected नव्हते.. त्याला वाटले ऋजु पुन्हा चिडेल, मग अजून मस्करी करू.. पण ही emotional च होते यार एकदम!
"बरं बरं ते जाऊदे.. ते सोड आता सगळं, उतरताना माझ्याबरोबरच उतर.. मनूचं काही खरं नाही ते कळलंच.." (खुंटा बळकट!) "आणि campfire आहे की नाही? चला पटपट.."
गडावर झाडी आणि मोकळी जागा दोन्ही होते, पाण्याचे कुंड होते. बाकी काही वस्ती नव्हती.. मोकळ्या जागेत मस्त campfire केली.. सगळे गोल करून बसले.. ऋजुता अर्थातच मनूशेजारी आणि अजिंक्य अर्थातच तिच्या समोर! मग काय campfire ची टीपीकल गाणी सुरू झाली.. हिल हिल पोरी हिला, वल्हव रे नाखवा, गल्यान साखली सोन्याची, गोमु संगतीनं.. मग गाण्याच्या भेंड्या.. अजिच सगळं लक्ष ऋजुकडेच.. मस्त हसत होती ती, गाणीही म्हणत होती.. बरीचशी पाठच होती तिला.. मगाचच्या भितीचा मागमूस नव्हता.. एकदम नॉर्मल दिसत होती.. मस्त वाटत होतं तिला पाहताना.. तिला कॅमेराबध्द करायची इच्छा कशीबशी दाबून ठेवली होती त्यानी.. तिला आवडले नाही तर.. मग सुरु झाले 'विविध गुणदर्शन'! अजिला नेहेमीप्रमाणेच गाण्याचा आग्रह झाला.. तो एरवी आढेवेढे घेत नसे, पण आज त्याचा काही सुचेचना.. शेवटी संदीप खरेनी हात दिला.. 'आयुष्यावर बोलू काही' सुरु केल्यावर सगळ्यांनीच सुरात सुर मिळवले.. मग अमितनी mouth organ वाजवला.. पल्लवी आणि नितेशनी नकला केल्या.. विनोदी होते ते फ़ार.. मजा आली.. इथे मनू ऋजुताला कसलातरी आग्रह करत होती, पण ती ऐकत नव्हती.. अजिनी लगेच chance घेतला..
"मनू काय गं, काय चालू आहे तुमचं?"
"ए ऐका रे, ऋजुताचं गाणं.. काय मस्त गाते ती.."
"हो का? झालच पाहिजे मग.." सगळ्यांनीच आग्रह केला.. ऋजु लाजत लाजत तयार झाली..
"पान जागे फूल जागे,
भाव नयनी दाटला
चंद्र आहे साक्षीला..
चांदण्यांचा गंध आला,
पौर्णिमेच्या रात्रीला
चंद्र आहे साक्षीला..
चंद्र आहे साक्षीला.."

अजिंक्य अवाक! कसलं गात होती! काय आवाज आहे हिचा.. तलम, मुलायम अगदी तिच्या नावासारखाच.. वॉव.. आणि नेमकं हेच गाणं हिने गावं.. चंद्राचं! अरे! तिला पण काही वाटत आहे का माझ्यासारखंच? अजि पहात राहिला ऋजुताकडे.. शब्द पण कसले होते गाण्याचे..

"कोण तू, कोण मी,
जाण ही नाही कुणा
कौतुकाने पाहतो
हा क्षणांचा पाहुणा,
स्वप्नरूपी हा फ़ुलोरा,
पापण्यांनी वेचिला
चंद्र आहे साक्षीला..
चंद्र आहे साक्षीला.."

अप्रतिम!! सगळेच तल्लीन होऊन ऐकत होते.. गाणं संपल्यावर एक मिनिट शांतच झालं सगळं.. ऋजुताच भानावर आली.. तिने अभिप्रायार्थ सगळ्यांकडे पाहिलं.. आणि त्यानंतर 'आयला', 'सही', 'पॉश', 'अफ़लातून' असे आवाज आले. अजि गप्पच होता.. जसं की mesmerised होता.. ऋजुता सगळ्यांचे feedback ऐकून हसली.. अजून एका गाण्याची फ़र्माईश अपरिहार्य होती..

"ये दिल कह रहा है
तेरे दिलकी जुबाँ
ए मेरे हमनशी
मैं जहाँ तू वहाँ"

आईगं! ही असली गाणी का गातेय? आणि काय गातेय.. मस्त मस्त एकदम.. आता अजिला नाहीच राहवलं.. त्याने ती गात असताना तिचे फोटो काढलेच.. शेकोटीचा उजेड तिच्या चेहेर्‍यावर पडला होता.. डोळे मिटून तल्लीन होऊन गात होती ती.. beautiful shot !! यानंतर मात्र पक्यानी सगळ्यांना उठवलं.. शेकोटीसाठी अजून थोड्या काटक्या जमवून बाजूनी sleeping bags टाकून लोक झोपले. अजिंक्यनी पहिला watch ठेवायचं काम आपणहोऊन अंगावर घेतलं.. आज लगेच झोप येणं शक्यच नव्हतं..

क्रमश:

**मार्तंडगड हे नाव काल्पनिक आहे. मुळात असा गड आहे का आणि असला तर त्यावर चढायला अवघड वाट आहे का याबद्दल मला काहीच माहिती नाही. गडाबद्दल अनवधानानी काही चुकीचे लिहिले गेले असेल तर क्षमस्व!

5 comments:

माझी दुनिया said...

पूनम,

महाविद्यालतीन जीवनाची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. गेले ते दिन गेले....

कथा ठराविक साच्यातली वाटत असली तरी मला आवडली. मात्र पुढची पोस्ट लवकर येऊदे, चक्क्यासारखे टांगून ठेऊ नका.

माझी दुनिया

Anonymous said...

'आयला', 'सही', 'पॉश', 'अफ़लातून' ....! :-)

कोहम said...

prem kathecha asach asata......tich story nehami chaan vatate....arthat tumhi mandani khup chaan keleyt....waiting

Parag said...

Poonam, jara naveen goshti lihi na.. Ethalya maayboli var ani maayboli chya ethe asa kay copy paste karat bastes? :)

पूनम छत्रे said...

parag, me mayboliwarach lihayala suruwat keli, tyamule je kahi nava lihite te tithe hi publish karate. blog suru kelyawar lalit ani katha adhi ithe post kelya pan nantar mayboliwar hi tya post kelya. je kahi juna mb war lihila ahe, te muddam ithe post karat ahe, so that blog readers na hi te vachayala milave.