August 20, 2007

’गुंडाळलेलं’ प्रेम!

मच्या घराजवळ हल्ली सर्रास सर्व residential एरिय़ाजवळ असते तशी ’चौपाटी’ आहे बरंका.. भेळ, पाणीपुरी, ज्यूस, सॅंडविच, दाबेली, डोसा ई दुकानं ओळीनी आहेत बरीच. ओघानी तिथे पार्किंगही भरपूर असतं. तर परवा तिथून जाताना एक मुलगा आणि एक मुलगी बाहेर पडताना मला दिसले. चालतचालत, एकमेकांशी काहीही न बोलता सरळ ते त्यांच्या दुचाकीकडे गेले.. मुलीच्या पूर्ण चेहर्‍यावर स्कार्फ गुंडाळलेला.. फक्त डोळे उघडे, आणि मुलाचा चेहरा तर चक्क हेल्मेटखाली! मला इतकी गंमत वाटली! आणि सवयीप्रमाणे ’थोडे’ प्रश्न पडले!
१) ज्या अर्थी चेहर्‍याचा इतका ’बंदोबस्त’ केला आहे, त्या अर्थी नक्कीच काहीतरी गडबड आहे! मग हे प्रेम त्यांना १० मिनिटं तरी ’मोकळा श्वास’ घेऊ देतं ना?
२) यांनी पाणीपुरी, किंवा तत्सम जे काय ते.. कसं खाल्लं असेल? तेव्हा तरी ही आवरणं दूर केली होती की नाही? का फक्त वासच घेतला?
३) रस्त्यावर सध्या इतकी गर्दी असते की साधं बोलतानाही एकमेकांशी ओरडून बोलावं लागतं, तर हे दोघं ’प्रेमाचे हळुवार कोमल बोल’ कसे बोलत असतील एकमेकांशी? का त्यांची मनंच बोलतात? (आमच्या लग्नाला इतकी वर्षं झाली, तरी अजूनही सगळं स्पष्टपणेच बोलायला लागतं, त्यामुळे असं ’ मनं समजून घेणार्‍या’ लोकांचा मला जाम हेवा वाटतो!)
४) जे काही दोनचार शब्द बोलत असतील ते एकमेकांना ऐकू कसे जात असतील?
५) प्रेमात ’डोळ्याची भाषा’ असते म्हणतात.. त्यावरच यांचं भागतं का? बाकीचा चेहरा लागत नाही का ही भाषा बोलायला?
ईत्यादि!

पण मला सांगा, हे नुसते चेहरे लपवून काही होतं का हो? (साधी पाणीपुरीही धड खाता येत नाही! ) त्या मुलीच्या ड्रेसवरून, पर्सवरून, अगदी तिने घातलेल्या सॅंडलवरूनही तिला सहज ओळखता येईल.. आणि मुलाकडे तर आख्खी दुचाकीच.. त्याच्या नंबरप्लेटवरून त्याला लांबूनही ओळखता येईल की. ते ज्या कोणापासून लपत आहेत ते काय इतके मूर्ख असतील का की येणार्‍याजाणार्‍या लोकांच्या फक्त तोंडाकडेच पहातील? बाकी काही दिसत नाही त्यांना असं यांना वाटतं का? प्रेमात ते दोघं आंधळे असतील हो, बाकी लोक कसे असतील, नाही का?

आणि हे तोंडं लपवून प्रेम करणं किती अनरोमॅंटिक आहे नाही? ’तिचा’ चेहरा कायम झाकलेला, त्यामुळे तिनी कोणती हेअरस्टाईल केली आहे, कानात काय घातले आहे, लिपस्टिकची शेड तिला चांगली दिसत आहे का.. हे त्याला कळणारच नाही.. आणि कळले नाही तर तो तारीफ तरी कशाची करणार? स्वानुभवावरून सांगते, की अशी प्रेयसीची तारीफ सुरुवातीला तरी करणं आत्यंतिक गरजेचं असतं बरंका.. नंतर संसाररथाला जुंपल्यानंतर खोटं बोलवत नाही हो! आणि खोटं तरी किती काळ बोलणार ना? प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, याच नियमानुसार प्रेमिकेच्या तोंडावळ्याची तारीफ करण्याची देखील एक वेळ असते... ती हीच.. नुकती प्रेमात पडल्याची. आणि नेमक्या त्याच वेळी ती बुरख्यात, आपलं फडक्यात! हाय रे दैवा! तसंच, तारीफ ऐकणं हे कोणत्याही वयोगटातल्या स्त्रीचं आवडतं काम. तीच तिला चक्क प्रेमात पडूनही ऐकायला मिळत नसेल तर काय उपयोग??

आणि ती? तिलाही वाटत नसेल का, की आपला बॉयफ़्रेन्ड किती ’हॅन्डसम’ दिसतो ते आपल्या मैत्रिणींना सांगावं? पण तो तर हेल्मेटखाली! त्याला दाढी चांगली दिसते की नाही, अभिषेक (बच्चन हो!) सारखी ’स्टबल’ चांगली दिसते, की फ़्रेंचकट बरा दिसतो, की अजिबात दाढी नकोच, नुस्ती मिशीच बरी, का पूर्ण ’क्लीनशेव्हन लूक’च बेस्ट याबद्दलची बहुमोल मतं ती कधी देणार? आणि तीच बरोबरही कशी आहेत हे त्याला पटवून देणार?

किमान या दोघांनी एकमेकांना प्रेमात पडण्यापुर्वी तरी नीट बघितलं असेल अशी आशा ठेवूया आपण. कारण त्यानंतर ’कोणीतरी पाहील’ या भितीनी हे, म्हणजे यांचे चेहरे लपलेलेच! मग थोड्या दिवसांनी चेहर्‍याचे ’फायनर डीटेल्स’ विसरायला होत असतील का हो? म्हणजे बघा हं.. मला तरी असं होतं.. एखादा चेहरा २-३ वेळाच पाहिला असेल आणि नंतर बराच काळ तो पाहिलाच नाही, तर तो चेहरा मनात थोडा धूसर होतो की नाही? आणि मग आपण त्याला ’आपल्या मनात असतं’ त्याप्रमाणे बघतो. असंच यांचं होत नसेल ना? अशक्य नाही! मग स्वप्नात पण तसंच दिसत असेल का? म्हणजे तिला वाटत असेल की तो ’सेम ह्रिथिक’ सारखा दिसतो.. त्यामुळे तिच्या स्वप्नात त्याच्याऐवजी ह्रिथिकच येत असेल का हो? मग तर बाप्पा, त्याच्या स्वप्नात कोणकोण येत असेल याची आपण कल्पनाही न केलेली बरी, ना?

आणि सर्वात महत्त्वाचं- हे एकमेकांना भेटल्यावर ओळखत कसे असतील? समजा, त्यांची भेटायची एक ’क्ष’ जागा आहे. त्या जागेवर ती रोज उभी असते त्याची वाट बघत. त्याला तो तिचा नेहेमीचा स्कार्फ परिचित आहे. एखाददिवशी तिने स्कार्फ बदलला, नवा गुंडाळला, तर तो तिला ओळखणारच नाही की! ती समोर असेल, पण त्याला दिसणारच नाही ना! ती नाहीये बघितल्यावर हा पटकन मनात म्हणेल... ’आज का बरं नाही आली ही? तिच्या भावानी आम्हाला इतका बंदोबस्त करूनही ओळखले तर नसेल काल?’ किंवा, सीनारीयो नंबर दोन: तिचा तोच स्कार्फ गुंडाळून त्याची गंमत करण्यासाठी तिची बहीण, किंवा मैत्रिण गेली एखाद्या दिवशी सहज तर? हा पठ्ठ्या तिच्यासमोर जाऊन उभा राहील आणि खूण करेल मागे बसायची.. ती बिचारी स्कार्फ काढायचा प्रयत्न करेल, तर हा भडकेल, घाबरेल आणि इकडेतिकडे न बघता पटकन तिला बसवेल की मागे आणि वेगळ्याच मुलीबरोबर हिंडेल! ही बिचारी मागून सांगायचा प्रयत्न करेल की ’ती मी नव्हेच’, पण त्याला कुठे ऐकू जायला? ’डोळ्यांची’ भाषा सुरु व्हायला वेळ असेल ना थोडा..निदान पाणीपुरीचा स्टॉल गाठेपर्यंततरी? आणि अजून एक सीनारीयो नंबर तीन- एखाददिवस उलटं झालं तर? त्याचा एखादा निरोप सांगायला त्याचीच बाईक घेऊन त्याचा मित्र आला त्या ’क्ष’ जागी तर? ही पण मागेपुढे न बघता बसली आपली मागे लगेच! तो कसला बावरेल ना? तिला ’वहिनी’ म्हणावं, की नावानी हाक मारावी, हेल्मेट काढावं की नाही, काढायचं झाल्यास सुरक्षित जागा कोणती.. वगैरे वगैरे वगैरे...

थोडक्यात हे गुंडाळलेलं प्रेमप्रकरण मला तरी फार कन्फ्यूजिंग वाटतंय बुवा! यात प्रेम कमी आणि भानगडीच जास्ती दिसताहेत. अरे, करता ना प्रेम, मग चेहरे का लपवता? लोक बघतील म्हणून? पण सच्च्या प्रेमिकांना लोकांची पर्वा कधीपासून वाटायला लागली? उलट असे चेहरे लपवले की लोकांचं लक्ष जास्त जातं.. माझ्यासारखे ’चौफेर लक्ष’ असणार्‍या जिज्ञासूंचं तर नक्कीच! जितकं सहजपणे वावराल, तितकं लोकांच्या नजरेत यायचा नाहीत.. कधी कळणार लोकांना, सहजपणे प्रेम करून, ते सफलही करायच्या युक्त्या? ;-)

10 comments:

Anonymous said...

आवडलंय!

"प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, याच नियमानुसार प्रेमिकेच्या तोंडावळ्याची तारीफ करण्याची देखील एक वेळ असते... ती हीच.."
...ही टीप दिल्याबद्दल धन्यवाद! आत्ताच्या आत्ता मी अमेरिकेला एक तारीफ़भरा ईमेल सोडतो:-)

Devidas Deshpande said...

बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्य अधिक श्रेष्ठ, असं मानणारा एक काळ आणि बाह्य सौंदर्याही न पाहता प्रेमात पडण्याचा हा काळ! प्रेमाचे मुखवटे घातल्यानंतर जगापासून तोंड लपविण्याची वेळ का यावी? माझ्यासारख्या माणसाला पडणारा प्रश्न वेगळाच आहे...मान खाली घालण्यासारखे एखाद्याने काहीही केलेले नसताना व चेहरा जगापुढे असतानाही प्रेमात पडण्यासारखं कोणाला काही का दिसू नये? बाकी, लेख छान झालाय. मजा आली.

Parag said...

Tya bicharyanna kalpana pan nasel ki aplyavar ha evhada mottha post lihila gelay... :D

Nice tpoic... keep it up ..

Parag said...
This comment has been removed by the author.
Shilpa Sane said...

Very nice write-up poonam!
Didn't really thought from all these angles.
Pan ase gundaLayachi punyat fashion aahech ki!! I'd felt is extremely strange when I saw it the first time :)
Bust still different topic n altogether different thoughts! Good one.

पूनम छत्रे said...

अभिजीत, डीडी, पराग, शिल्पा धन्यवाद! :)

अभि, तारिफची मेल गेली की नाही अजून? रोज एक तरी मस्ट आहे! :)

डीडी, खरं तर हा विषय खूप गंभीर आहे. प्रेमीजीवांना ’एकांत’च लागणं, तोंडं लपवत फ़िरणं, आणि त्या अनुषंगाने टवाळ लोकांनी त्याचे घेतलेले गैरफायदे ई. पण म्हणलं, जरा विनोदी ढंगानी लिहिता येतं का ते पाहू :)

पराग, हो ना :) कोणती व्यक्ति कशाची ट्रिगर बनू शकेल कोणीच सांगू शकत नाही! :)

शिल्पा, हो गं, प्रदूषणामुळे दुचाकीवर स्कार्फ गुंडाळून बसायची पद्धत आहेच पुण्यात. पण ते वेगळं आणि ’हे’ वेगळं ;)

पूनम छत्रे said...
This comment has been removed by the author.
Anonymous said...

Fine post. Loved it :)

Tanvi said...

ho ga poonam aagadi sahamat aahe mi tujhyaashi... yala kharach prem mhanaycha ka ???

प्रशांत said...

मस्तच लिहिलंय. मज़ा आ गया!