June 26, 2007

अभिषेकचा हेअरबँड

दोन दिवसांपूर्वी माझा छोटा मित्र भेटला.. छोटा म्हणजे कॉलेजकुमार आहे.. केस काहीतरी वेगळेच दिसत होते..
"अरे हे केसांचं काय केलं आहेस? काहीतरी वेगळाच दिसत आहेस.."
"थँक्स गं.. अगं मी केसाला हेअरबँड लावलाय! ही सध्याची लेटेस्ट फ़ॅशन आहे.. ’अभिषेक बच्चन हेअरबँड’"
मी ऐकून चाटच पडले..
"म्हणजे काय? अभिषेकचा कसला हेअरबँड? आणि तू चक्क हेअरबॅंड लावला आहेस? मुलींसारखा?"
"अगऽऽऽऽऽऽ.." माझ्या अज्ञानाची कीव करत तो म्हणाला, "पाहिलं नाहीस का? मधे त्याने केस वाढवले होते, तेव्हा त्याला ते मॅनेज करता येईनात.. म्हणून तो असा हेअरबँड लावायला लागला! बघ ना, कसला मस्त आहे ना? एकदा लावला की केस फ़िट्ट बसतात.. हिट आहे.."
"अरे पण तो लावतो म्हणून तूही लावतोस? हेअरबँड तर आत्तापर्यंत मुलीच वापरायच्या असं ऐकलं होतं मी!"
"तसं काही नसतं गं आता.. माझे मित्र आणि मैत्रिणी.. सगळे वापरतो.. इट्स युनिसेक्स यू नो!"

मी तर गारच पडले होते. साधारणपणे कालपरवापर्यंत मुलं केस कापायची अशी माझी समजूत होती. पण ते तरी काय करणार बिचारे? अभिषेक बच्चन जर केस वाढवून हेअरबँड लावणार असेल, तर त्यांनाही तसेच करणे भागच नव्हते का?

मुळात अभिषेकला केस वाढवायचे काय पडले होते? हा आधी केस वाढवणार आणि मग ते सावरता येत नाहीत म्हणून हेअरबँड लावणार! वर हे ’यूथ आयकॉन’.. याच्याकडे पाहून देशातले समस्त मुलगे जोमानी केस वाढवणार आणि वर हा ’यूनिसेक्स हेअरबँड’ लावून मिरवणार!

हे मुलग्यांचं ’केस वाढवणं’ प्रकरण काही कळत नाही मला.. वर्षानुवर्षं चालत आलेले संकेत आहेत, न्हाव्याची दुकानं गल्लोगल्ली आहेत.. बरं न्हावी नको असेल तर ’पार्लर्स’ही आहेत बायकांसारखी.. पण!!!!

असाच एक डायलॉग तुळशीबागेतल्या एका दुकानातही ऐकला..

दुकान टिपीकल ’तुळशीबाग’ थाटाचे होते.. म्हणजे टिचभर जागा आणि प्रचंड सामान.. टिकल्या, बांगड्या, विविध पिना, रबर्स, रबरबँड्स असे काही काही.. माझ्याच शेजारी एक जोडपं होतं.. म्हणजे असावं बहुदा.. कारण त्यांची बर्‍यापैकी जवळीक वाटत होती.. पण ती तशी आजकाल ’नुसत्या मित्रमैत्रिणींमधेही’ असते.. असो!
मुलगा: "ए हे बघ, इथे ते तसे रबरबँड्स आहेत"
मुलगी: "कोणते रे?
मुलगा:"ते बघ की.. छोटे.. ओ भैय्या, इसमें ब्लॅक कलर है क्या?"
भैयानी इमानदारीत काळ्या रंगाचे रबर्स काढून दिले.. ते पाहून तो मुलगा एकदम खुश झाला. मुलीला म्हणाला..
"ए हे बघ, कसले परफ़ेक्ट आहेत ना.. असेच बघत होतो मी.."
"पण मला असे नको आहेत, फ़ार घट्ट बसतात"
आता मी दोघांच्याही केसांच्या लांबीकडे पाहिले.. मुलीला खरं तर रबरची गरज नव्हती पण मुलाला कात्रीची मात्र गरज होती!
"तुझ्यासाठी कुठे, मी माझ्यासाठी बघतोय!!!!!"
हे त्या मुलीलाही अपेक्षित नसावं बहुदा. तो मात्र जाम एक्साईट झाला होता मनासारखे रबरबँड्स बघून..

"ए, तु केस नाही बांधणारेस.. किती बोअर दिसतं ते.. !"
"चिल्ल! मी खरच घेतोय हे रबर्स. इट्स सो कूल. तुलाही आवडेल, जस्ट वेट. कैसे दिये भैय्या? दस देदो, बराबर रेट लगाना हां.."

मला पुन्हा एकदा शंभर प्रश्न पडले! का? पुरुषांना केस वाढवायचे आकर्षण का वाटायला लागेले असेल? नाही म्हणजे साधू केस वाढवतात (कारण ’साधनेला’ बसल्यावर कुठे केसाबीसांकडे लक्ष जाणार ना?), अगदी पुराणकाळात ग्रीक लोक, रेड इंडीयन पुरुषांचेही लांब केस असायचे, अगदी वेण्याबिण्या.. पण त्याला शेकडो वर्ष लोटली ना? हे आत्ता का? कोणीतरी एक सलमान खान एका सिनेमात मधे भांग पाडून बॉबकट करतो, की त्याचे समस्त चाहते बॉबकट मधे.. अभिषेक हेअरबँड लावतो की हौसेनी मुलगे चक्क तुळशीबागेत जाऊन तसले हेअरबँड विकत घेतात.. या मोठ्या, बड्या लोकांनी असली फ़ॅडं केली की आपण लग्गेच त्यांचं अंधानुकरण करणं कितपत योग्य आहे?- निदान लांब केसांबाबत तरी! खासकरून कॉलेजची मुलं तर असल्या आचरटपणाला लग्गेच भुलतात.. लांब केसांनी काय अभ्यास अजून चांगला होतो का? की मैत्रिणीवर जास्त इम्प पडते? का ’हा’ करतोय म्हणून ’मी’ पण?

कल्पना करा, तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी कोणत्याही मोठ्या कार्यालयात गेलात आणि तिथला इन-चार्ज किंवा मेन माणूस असा लांब केसांचा असेल तर कमीतकमी पहिलं इम्प्रेशन तरी वाईट नाही होणार? तुमची मैत्रिण किंवा बहीण तिच्या होणार्‍या नवर्‍याशी तुमची पहिल्यांदा ओळख करून देतीये- त्याचे केस पोनीटेल मधे बांधले आहेत!- तुमच्या मनात तिच्या निवडीबद्दल शंका नाही येणार क्षणभर तरी? त्यापेक्षा आपल्या आर्म्ड फोर्सेस मधले जवान पहा. व्यायामानी कमावलेलं शरीर आणि त्यांचा तो खास ’सोल्जर कट’! मनात आपोआप एक आदराची भावना निर्माण होत नाही? केस पिंजारलेला जवान हा ’जवान’ वाटेल? त्याचा निम्मा वेळ आरश्यासमोर ’केस मॅनेज’ करण्यात जाणार असेल तर तो त्याची ड्युटी व्यवस्थित बजावू शकेल? तेच कशाला? कोणत्याही क्षेत्रातले उच्च पदाला पोचलेले पुरुष पहा- एक तर बिचारे इतकं काम आणि अविरत परिश्रम करतात की त्या उच्चपदाला पोचेपर्यंत त्यांच्या केसांनी त्यांच्यापासून फ़ारकत घेतलेली असते! पण ज्यांचे शाबूत असतात, ते व्यवस्थित असतात. त्यांना वेळ कुठे असतो असली फॅडं जपायला? हल्ली स्त्रीयाही ’निगा राखणं होत नाही, बघायला वेळ होत नाही’ म्हणून केस छोटे ठेवतात, आणि प्रॅक्टीकली पाहिलं तर ते योग्यच आहे. तर मग पुरुषांचा हा अट्टाहास का? केवळ ते सध्या ’इन थिंग’ आहे म्हणून?

यात असाही मुद्दा उपस्थित होऊ शकतो की ’दिसण्यात काय आहे, काम, कर्तृत्व महत्त्वाचं’ वगैरे. मान्य आहे. तरीपण खूप हुशार, कर्तृत्ववान, प्रगल्भ माणूस लांब केस ठेवेल, ठेवू शकेल हे लॉजिक काही मनाला पटत नाही बुवा! (इथे उगाचच हरीहरन आणि प्रल्हाद कक्कर का आठवत आहेत मला? )

सुंदर, दाट, लांब, काळेभोर केस हा दागिना- पण स्त्रीयांचा! पुरुषांचा नव्हे. एकतर निसर्गत: पुरुषांच्या केसांना इतकी वाढ नसते. तरीपण ते वाढवायचे आणि त्याला निरनिराळी आभूषणं चढवायची इतकी हौस का? ’चिनी कम’ या चित्रपटात अमिताभनी प्रथमच त्याच्या इतक्या मोठ्या कारकीर्दीत केसाचा पोनी घातला आहे- तोही त्याची आई त्याला नंतर छाटायला लावते- तो ’मुलीच्या’ वडीलांना भेटायला जाणार म्हणून!! तुम्ही पाहिलं असेल तर बहुतांश हिंदी सिनेमात तर लांब केस ’राखून’ असलेला व्हिलनच असतो!!! म्हणजे बघा!

अर्थात नियमाला अपवाद आहेतच- रफ़ेल नदाल, महेंद्र धोनी, ’क्रिश’मधला हृतिक.. पण हे अपवादच हं! असेल गल्लोगल्ली फ़िरायला लागले तर खचितच आवडणार नाही! तात्पर्य काय की मुलग्यांनी लांब केस ठेवलेले अजिबात चांगले दिसत नाही.. (खुद्द बायकांचच तसं मत आहे! उद्या ’ऍशला आवडत नाहीत’ म्हणून अभिषेक केस कापून ’सभ्य कट’ करतो की नाही बघा!) असल्या फॅशनी काय येतात आणि जातात.. तुम्ही त्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही आपली जगमान्य असलेली हेअरस्टाईलच ठेवा.. लांब केसांचं डिपार्टमेन्ट स्त्रीयांकडेच ठेवा.. आधीच का स्त्री-पुरुषांमधे वादाचे विषय कमी? त्यात ’तुझे केस लांब की माझे, माझे जास्त छान की तुझे’ ई वाद नकोत! तुम्ही फ़क्त स्त्रीयांच्या लांब, सुंदर केसांची स्तुति करा.. don't compete, compliment!

9 comments:

बाजीराव said...

एका चांगल्या विषयाला वाचा फोडली आहे. ग्लोबलायझेशनचे वारे सुटले आहेत. चहुकडून माहिती आदळतेय. त्यात नको ती माहिती सुद्धा मिळतेय. टीव्ही चॅनल्स, चित्रपट, इंटरनेट, प्रसारमाध्यमं सगळ्यांचाच हातभार! त्याचेच हे फळ आहे. कूल ना? :-)

Parag said...

:)

sangeetagod said...

I beg to disagree. One should be able to choose appearance regardless of gender.
There were similar comments when girls started bob-cuts. Its really a personal choice and I think we can be more open and respectful to things that don't fit in our "sphere of exposure". Young generation is doing exactly what they are supposed to - experiment.

पूनम छत्रे said...

बाजीराव, कूल? :)

पराग, नुसतच हसला आहेस, म्हणजे हा ब्लॉग ’बरा’ आहे असं समजून चालते! :)

sangeetaa, agreed. 'appearance' is a personal choice. experiments on one's look are most welcome, but those should be original.. not bcos some abhishek, or xyz is doing it, I should follow. and if i dont, i am out of place! ’अंधानुकरण’ करू नये असं माझं मत आहे.
आपण ब्लॉग वाचून आवर्जून प्रतिक्रिया दिलीत, याबद्दल धन्यवाद! :)

Rodrigo said...
This comment has been removed by a blog administrator.
अनु said...

hmm. I also feel the same. Pan tya rastya rastyavarachya dhoni ani john ani hritik na patayala pahije na?
Hairband mhanaje jara atich hote.Mi pan asa ek mulaga pahun chakravale hote.

sangeetagod said...

Poonam,
Thanks for taking my comment sportively. I agree that one should not blindly follow any thing. However,is there any such thing as originality when it comes to one's get up?
While some people are blindly following xyz or Abhishek, others are blindly following the age-old practices or their parents, sisters etc.

Deepali said...

Mala ulat prachand vidvan lok mahanje kes vadhavalele dolya samor yetat:d
Newton, Gallilio, Einstein ani itar tamam scientists sagale lamb kesanche asatat:D
Latest mhanle tar apale rashtrapati, Abdul kalam.
Mulat bhartiy puranat pan bahuda apaya sanskrutit lamb kesanchich fashion kinva chalti hoti:)
Sagale dev, ani itahasachya pustakatale barech thor purush lamb kesanchech distat :0
Mulanni short hair cut karne kadhi ale konas thauk!
Anyways, pan college crowd arthatach scientists chi copy nahi karat, te abhishek, JA kinba dhonichi ch copy kartata he he kharech:)
~Deepanjali(DJ)

Deepali said...

Mala ulat prachand vidvan lok mahanje kes vadhavalele dolya samor yetat:d
Newton, Gallilio, Einstein ani itar tamam scientists sagale lamb kesanche asatat:D
Latest mhanle tar apale rashtrapati, Abdul kalam.
Mulat bhartiy puranat pan bahuda apaya sanskrutit lamb kesanchich fashion kinva chalti hoti:)
Sagale dev, ani itahasachya pustakatale barech thor purush lamb kesanchech distat :0
Mulanni short hair cut karne kadhi ale konas thauk!
Anyways, pan college crowd arthatach scientists chi copy nahi karat, te abhishek, JA kinba dhonichi ch copy kartata he he kharech:)
~Deepanjali(DJ)