June 11, 2007

बूमरँग

भाग पहिला:-

का सुंदर घराच्या सुंदर, नाजूक पडद्याने सजवलेल्या खिडकीपाशी सुप्रिया चिंताग्रस्त अशी उभी होती.. खोल खोल विचारात बुडालेली होती.. डाव्या हाताची तर्जनी डाव्या कानशीलाशी टकटक करत आहे, उजव्या हाताची बोटं गळ्यातली मोत्यांची माळ चाचपडत आहेत.. अशी फ़ार गंभीर अवस्था झाली होती तिची!

सुप्रियेची एकुलतीएक तरूण मुलगी उर्वशी हे तिच्या चिंतेचं कारण होतं! उर्वशी नावाप्रमाणेच देखणी होती, नखरेल होती, चेहरा तर अगदी भावपूर्ण होता तिचा.. डोळे तर अशी फ़डफ़डवायची की समोरचा घायाळच व्हायचा! वाणी तर अश्शी मिठ्ठास की कोणालाही विरघळायला व्हावे! आपल्या सौंदर्याची पुरेपूर जाणही होती तिला. कोणाशी कसे बोलायचे हे व्यवस्थित ठाऊक होते. कॉलेजमधले अनेक युवक उर्वशीच्या मागे आपलं हृदय, बाईक आणि पाकीट घेऊन हिंडत होते, आणि ही त्यांना व्यवस्थित झुलवतही होती.

उर्वशीची कशीबशी ३ वर्षं पार पडली होती कॉलेजची.. वर्ग मात्र दोन घरंच पुढे सरकला होता.. पण ते ठीक होतं.. सुप्रियाला त्याची काळजी नव्हती..

उर्वशीनी आपल्या सौंदर्याच्या बळावर एखादा सात पिढ्या आरामात बसून खातील इतका श्रीमंत पोरगा गटवावा, त्याच्याशी लग्न करावं आणि सुखात रहावं.. हे सुप्रियाचं स्वप्न होतं. तिनेही तिच्या तरूणपणी हेच केलं होतं.. श्रीकांतला पटवलं होतं.. लग्नानंतर तो तिच्या हातचं बाहुलं बनला होता. ती नाचवेल तसा नाचत होता बिचारा. तिने उर्वशीलाही तसेच काळजीपूर्वक ’ट्रेन’ केलं होतं.. जीवनात पैसाच किती महत्त्वाचा आहे हे तिच्या मनावर ठसठशीतपणे बिंबवलं होतं.. ते थोडेसेच श्रीमंत होते, उर्वशीनी श्रीमंतीत लोळावं अशी सुप्रियाची महत्त्वाकांक्षा होती!

सध्या सुप्रियाला उर्वशीची लक्षणं काही ठीक दिसत नव्हती.. सारखी गुणगुणायची काहीतरी, हरवल्यासारखी दिसायची, मधेच खुदकन हसायची, मोबाईलवरचे संभाषण हळू आवाजात होत होते, आरश्यासमोरचा वेळ वाढला होता.. नक्कीच उर्वशी कोणाच्यातरी प्रेमात पडली होती! आता तो कोण होता याच्याशी सुप्रियाला काही देणंघेणं नव्हतं.. पण तो जर भणंग, किंवा टिपीकल मध्यमवर्गीय असेल तर मात्र सुप्रियाला ते मुळीच पसंत नव्हते!! एकवेळ तो बुद्धीनी कमी, दिसायला सुमार असता तरी चालला असता, पण त्याच्याकडे चिकार पैसे असणे अत्यंत आवश्यक होते. पण हे वयंच फ़ार फ़सवं हो! एखाद्या ’आदर्शवादी’ तरूणाच्या प्रेमात ही मुलगी पडलीबिडली तर सगळंच मुसळ केरात! छे छे छे! आता काहीतरी सोक्षमोक्ष लावणं आवश्यकच होतं..

इतक्यात उर्वशी आलीच बाहेरून. नेहेमीप्रमाणेच गुणगुणत होती.. मूड बरा दिसत होता. सुप्रियाने हटकलेच तिला..
"हाऽऽऽय ऊ!"
हो, तसे मायलेकीचे संबंध अगदी मैत्रीपूर्ण होते.. मायलेकी कमी आणि मैत्रिणीच जास्त होत्या त्या.. ’ऊ’ थबकली. तिलाही काहीतरी सांगायचच होतं मॉमला.. आजच ते घडलं होतं ज्यासाठी ती गेले कित्येक दिवस प्रयत्न करत होती..
"हाऽऽय मॉम्स.. काय मस्त दिसत आहेस तू.. ही ती परवा आपण घेतलेली साडी ना? तुला अगदी शोभून दिसत आहे हां.."
"चल गं ऊ, माझं काय घेऊन बसलीस.. तुझे आता नटण्यामुरडण्याचे दिवस.. तूही दिवसेनदिवस गोड दिसायला लागली आहेस.. कॉलेजमधली सगळी मुलं फ़िदा ना.."
यावर ऊ लाजलीबिजली चक्क..
"हे काय गं मॉम्स.. काहीतरीच हं तुझं.."
"हंऽऽऽ, आम्हाला समजत नाही की काय.. काय गं, पण तुला कोणी आवडतो की नाही?" सुप्रियानी चाचपडलं जरा..
"काय गं मॉम्स.. आम्ही नाही जा.." ऊ नी चक्क चेहरा हातात लपवला..
भगवंता!! सुप्रियाची शंका खरी ठरली होती.. आता फ़ारच नाजूकपणे हे हाताळायला हवे होते.. तिने देवाचा धावा करायला सुरुवात केली.. लेकीनी थोडा तरी पैसेवाला पाहिलेला असूदे रे बाबा.. माझी शिकवणी अशी फ़ोल जाऊ देऊ नकोस रे..

अंमळ धसकलेली असूनही वरवर हसून सुप्रिया म्हणाली,
"ए असं नाही हं.. मॉम्सपासून काय लपवतेस अं? बरोब्बर ओळखलं की नाही तुझं गोड गुपित मी.. आता सांग पाहू कोण आहे तो भाग्यवान? तुझ्या कॉलेजमधेच आहे का? तुझ्या ग्रुपमधला कोणी? माझ्या माहितीचा आहे? सांग ना गं, मला अगदी रहावत नाहिये बघ.."

"मॉम, आज मी खूऽऽऽप खुश आहे गं.. तुला सांगणारच होते मी.. आमच्या किनई कॉलेजमधे आहे एक मुलगा.. रजनीकांत फातर्फेकर.. त्याला किनई मी खूप आवडते.. म्हणजे त्याला तशी मी बरेच दिवसांपासून आवडत होते, पण त्याचा धीर होत नव्हता.. शेवटी आज त्याने मला विचारलंच.. म्हणजे मीच त्याला भाग पाडलं विचारायला.. मॉम्स, त्याने मला प्रपोज केलय!" प्रचंऽऽऽऽड लाजत ऊ नी पुन्हा चेहरा ओंजळीत लपवला..

ईऽऽऽऽऽऽ रजनीकांत फातर्फेकर!! काय तरी नाव आहे. सुप्रिया जरा खट्टूच झाली. मुलगा कसा आहे कोण जाणे! नावाप्रमाणेच बंडल नसला म्हणजे मिळवली.. पण मनातून अजूनही आशा होती ऊ च्या व्यवहारीपणावर.. तरीही एकदा खात्री तरी करून घ्यायला हवी ना..

पुन्हा एकदा हसण्याचं नाटक करून सुप्रिया म्हणाली,
"अरे वा! चक्क लग्नाचं प्रपोजल.. वा! मज्जा आहे एका मुलीची.. पण अजून काहीतरी सांग ना तुझ्या या रजनीबद्दल.. कुठे रहातो, त्याचे वडील काय करतात, कसा येतो तो कॉलेजला, कमीतकमी झेन तरी असेलच ना त्याच्याकडे???"

"शीऽऽऽ झेन काय मॉम्स.. होंडा सिटी आहे त्याच्याकडे! अगं तुला स्ट्राईक झालं नाही का? फातर्फेकर म्हणजे कोण ते.. ’श्यामसुंदर ईंडस्ट्रीज’ चे मालक.. १८ खोल्यांचा आलिशान बंगला आहे त्यांचा, आहेस कुठे? रजनी त्यांचा एकुलता एक मुलगा!!"

ऐकता ऐकता सुप्रियाचे डोळे विस्फ़ारत होते नुसते!! आपल्याला आनंदातीशयाने चक्करबिक्कर येणार की काय असं वाटायला लागलं तिला.. फातर्फेकर!!! मोठ्ठाच मासा शोधला होता उर्वशीने.. मुलीविषयी अभिमान वाटायला लागला तिला.. शिकवणी फ़ुकट तर गेली नव्हतीच, उलट चांगलीच फ़ळली होती.. उर्वशी फातर्फेकरांच्या साम्राज्याची राणी होणार होती.. पावला.. देव पावला...

सुप्रियानी उर्वशीला मीठीच मारली..

"ऊऽऽऽऽ.. माझी लाडाची लेक, माझी सोनी.. दृष्टच काढते तुझी आता.. अग्गंऽऽऽ कसं जमवलंस हे? मला तर कस्सली भिती वाटत होती.. म्हणलं कोणी आदर्शवादी टीपीकल मिडलक्लास भेटला आहे की काय?"

"ईऽऽ मॉम्स काहीही काय.. मिडलक्लासकडे ही उर्वशी बघतही नाही.. पण रजनीला पटवणं सोपं नव्हतं हं.. कित्ती दिवस ट्राय करत होते माहित्ये! हा आता लास्ट ईयरला आहे.. म्हणलं हा कॉलेजमधे आहे तोपर्यंतच पटवलं पाहिजे.. बाहेर पडला की काही स्कोप नाही! इतका श्रीमंतीत लोळणारा असूनही फ़ारच सिन्सीअर आणि सरळ मुलगा आहे गं रजनी.. त्याचा इतका त्रास झाला मला माहित्ये.. त्याच्यासाठी म्हणून मला चक्क अभ्यासाचं नाटक करावं लागलं, त्याच्या वर्गातल्या त्या बोर, स्कॉलर मानसीबरोबर मैत्री करावी लागली, कारण ती त्याची मैत्रिण ना.. छे.. फ़ार झेललं बाई तिला.. पण एकदा रजनीशी ओळख झाल्यावर मग काही प्रॉब्लेम नाही आला.. आता तर इतकं गुरफ़टवलं आहे ना मॉम्स मी त्याला माझ्या प्रेमाच्या जाळ्यात, की माझ्याशिवाय जगू नाही शकणार तो! आज लग्नाची मागणी घातली त्याने मला एकदाची, तर मी लग्गेच ’हो’ म्हणले नाही काही.. विचार करून सांगते म्हणाले.. २-४ दिवस तडपू दे बिचार्‍याला! पण मॉम्स, एक मोठ्ठा प्रॉब्लेम आहे मॉम्स.. त्याच्या घरचे कदाचित विरोध करायची शक्यता आहे.. आपण श्रीमंत असलो तरी त्यांच्या स्टेटसच्या मानानी कमीच ना.. आणि तसाच प्रखर विरोध झाला, तर रजनी मला सोडेल सुद्धा.. त्याचा त्यागाबिगावर प्रचंड विश्वास आहे बाई! "

सुप्रियाच्या सुपीक डोक्यात गरागर चक्र फिरायला लागली..तिनी लेकीला अतीव मायेनी जवळ घेतलं..

"ऊ, फ़ार केलंस सोने. सुकली माझी लाडी ती.. पण आता मॉम्स आहे ना तुझी.. तू सगळी सूत्र माझ्या ताब्यात दे. मी अस्से डाव टाकते की फातर्फेकर स्वत: गुडघे टेकत येतील आपल्याकडे.. तुझ्यासाठी.. आहेस कुठे?"

"हो मॉम्स? म्हणजे काय करणार तू? कारण रजनी तसा फ़ारच बोर आहे गं.. अभ्यास, आदर्श ध्येय, असं काहीबाही बोलत असतो.. खूप पैसे आहेत म्हणून बरं हं त्याच्याकडे.. नाहीतर त्याला सहन करणं म्हणजे.. "

"ऊ मी असताना तू काऽऽऽऽऽही काळजी करू नकोस! आपण बरोब्बर करू सगळं.. मी प्लॅन सांगते तुला.. हे असंच झुलवत ठेव तू रजनीला.. चक्क सांग की माझ्या आईचा विरोध आहे.. तिला हे आपलं अजिबात पसंत नाही.. मग तो पेटून उठेल.. त्याला नकार सहन व्हायचा नाही.. मग तू त्याला सांग की मॉम्सनी माझं लग्न दुसरीकडे ठरवलं आहे..त्याच्याशी बोलू नकोस, भेटू नकोस.. मग तर तो तुझ्या विरहात वेडापिसा होईल.. त्याचं कुठेही लक्ष लागणार नाही.. त्याची तब्येत खराब होईल, अभ्यास विसरेल, ना धड खाणार नाही, ना कोणाशी बोलणार नाही.. त्याच्या घरचे त्याच्या काळजीत पडतील.. त्यांना आधी समजणार नाही की कश्यामुळे त्यांच्या लाडक्या लेकाची अशी अवस्था झालीये.. जेव्हा त्यांना समजेल तेव्हा ते रजनीला नक्की तुझ्यापासून परावृत्त करायचा प्रयत्न करतील.. पण तुझ्या प्रेमाची अशी जादू असेल रजनीवर की नाईलाजाने त्यांना आपल्याकडे यावच लागेल नाक घासत.. मग त्यानंतरच आपण त्यांच्यावर दया करून त्यांच्या लग्नाच्या प्रस्तावाला होकार देऊ.. असं केलं तर बघ, रजनी कसा आयुष्यभर तुझ्या मुठीत राहील.. तू कधीही त्याला सोडून देशील अशी भिती त्याच्या मनात कायम राहील आणि तो त्यापायी तुझं सगळं म्हणजे सगळं ऐकेल.. सोने, राणी होऊन राहशील तू तिकडे, बघ!"

ऊ अवाक! काय ग्रेट होती मॉम्स! कस्सल्ला परफ़ेक्ट प्लॅन होता.. लवकरच ती खूऽऽऽऽऽप श्रीमंत होणार होती.. लवकरच..

क्रमश:

1 comments:

मल्हारी said...

कथेचा प्रवाह चांगला सुरु झालाय. कथा पूर्ण झाल्यावर प्रतिक्रिया द्यायला मला आवडेल. :-)