May 19, 2007

सुटका

यंतरावांनी अधीरतेनी कुरियरवाल्यानी दिलेलं पाकीट फोडलं.. दादाकडूनच आलेलं होतं.. त्यांनी राधाताईंना हाक मारली..

"अगं एऽऽ, हे पाहिलस का? दादाकडून कुरियर आलंय बघ.."

राधाताईही लगबगीनी बाहेर आल्या.. "अगंबाई, आलं का? काय काय आहे?"

"हो हो. नीट पाहू तरी दे. हा बघ, हा सगळा प्रोग्राम दिसतोय.. तारीखवार तपशील आहेत त्यात. नीट पाहून ठेव कुठे कुठे कधी जाणार आहोत आपण ते. दादाला नीट पाहून फोन करतो. तो वाटच पहात असेल आपल्या फोनची.."

"हो हो, मलाही वहिनींशी बोलायचंय..."

"काय मग राधाबाई.. बरोब्बर एका महिन्यानी तुमची परदेशवारी सुरु तर!"
जयंतरावांनी थोडं चिडवलं राधाताईंना.

"खरंच की हो. एक महिनाच राहिला आता. सगळी नीट तयारी करायला हवी आत्तापासूनच. वन्सनांही फोन करून टाका तुम्ही."

"हो हो. तू हे नीट वाच एकदा. मग मी त्याच्या कॉप्या काढून आणतो. एक जयश्रीकडे लागेल, आणि दोन मेधा-मायाकडेही पाठवूया. एक शेजारी जोश्यांकडेही देऊया लागली तर म्हणून.."

"झालंच म्हणजे. भाऊजी सांगलीभर करतील आपण सिंगापूरला जाणार ते."

"करूदे की.. जाणार तर आहोतच ना आपण?" जयंतराव हसले. परदेशवारीचं स्वप्न होतं त्यांचं जे आता लवकरच पूर्ण होणार होतं...

जयंतराव, राधाताई, जयंतरावांचे मोठे भाऊ- दादा आणि वहिनी असे चौघे सिंगापूर, मलेशियाच्या ट्रिपला निघाले होते. खरं तर दादांनी हा घाट घातला आणि त्याला जयंतरावांची बहिण जयश्रीचा भक्कम पाठींबा मिळाला म्हणूनच हे शक्य झालं होतं. अलिकडे पुण्यामुंबईचे लोक सर्रास युरोप, अमेरिका, सिंगापूरचे दौरे करतात.. आपणही एक असा दौरा करावा अशी जयंतरावांची सुप्त इच्छा होती. तशी आर्थिक अडचणही नव्हती. पण त्यांची ८२ वर्षांची वृद्ध आई त्यांच्याकडे होती. तिला एकटं सोडून फ़िरायला जाणं शक्यच नव्हतं.

तशी या आधी जयंतराव-राधाबाईंनी भारतातली ठळक ठिकाणं पाहिली होती. पण अलिकडे, गेल्या ५ वर्षात फिरायला तर सोडाच, पण त्यांच्या मुलींकडेही त्यांना जाता आलं नव्हतं. उभयतांना दोन मुली होत्या- मेधा आणि माया. दोघी शिकलेल्या होत्या आणि सुखानी संसार करत होत्या.. मात्र दोघी लांबच्या गावी होत्या.. मेधा पुण्याला, तर माया नाशिकला. मुली शिकत होत्या, लग्नं व्हायची होती तेव्हा हे दोघं वर्षाकाठी एकदा यात्रा कंपनीबरोबर फिरून यायचे. तेव्हा माईंना उभारी होती, मुलींची सोबत होती. पण धाकट्या मायाचं लग्न झालं ५ वर्षांपूर्वी आणि माईही एकदम खूप थकल्या. तशी त्यांना कुठली व्याधी नव्हती, पण शरिरच साथ देईना. गरगरल्यासारखं व्हायचं, मधेच चक्कर यायची, जीव घाबरल्यासारखा व्हायचा, विस्मृति होत होती- कधी औषध घ्यायच्याच नाहीत, कधी दोनदा तेच घ्यायच्या.. त्यामुळे त्यांच्या सोबत सतत कोणी ना कोणी लागायचं.. तसं दोन-तीन तास एकट्या राहू शकत त्या, पण त्यापेक्षा जास्त वेळ नाही. मनानीही निवृत्त झाल्यासारख्या झाल्या सगळ्यातूनच.

माईंची सगळी हयात सांगलीतच गेली. सासर-माहेर सगळं इथेच. दादाकडे मुंबईला आधी जात असत त्या. २-३ महिने रहायच्या, पण त्यांना मुंबई आवडायची नाही विशेष. तसंच नातींची लग्नं झाल्यावर त्यांच्याकडेही त्यांचे संसार पहायला जाऊन आल्या होत्या एकदा. आता मात्र बाहेर थांबलं होतं. घराबाहेर पडलं की भीती वाटायची, हेलपाटे जायचे. एक छोटी चक्करही मारता येईल असा विश्वास नव्हता. त्यामुळे माई सतत घरीच असायच्या. कोणी आलं तर विरंगुळा, नाहीतर थोडा वेळ टीव्ही, थोडा वेळ वाचन करायच्या. जयश्री, त्यांची मुलगी सांगलीतच होती. ती तिच्या संसारात, व्यापात असायची, जमेल तशी माईंना भेटायला यायची.

अशातच एक दिवस दादांचा जयंतरावांना फोन आला की ’आम्ही सिंगापूरचा प्लॅन करत आहोत, तुम्ही दोघं येणार का?’ असाच फोन दादांनी जयश्रीलाही केला होता. पण तिला काही कारणानी जमत नव्हतं, म्हणून दादांनी जयंताला विचारले. जयंतरावांच्या इच्छेनी एकदम उचल खाल्ली. पण माईचं कसं करायचं? तिला एकटं टाकून कसं जायचं? पण या वेळी जयश्री अगदी भक्कमपणे त्यांच्या पाठीमागे उभी राहिली.

"मला माहित आहे जयंता तुला किती हौस आहे परदेशवारीची. दादा अनायसे जातोय, त्याची सोबत आहे, तर जा तुम्ही दोघंही त्यांच्याबरोबर."

"अगं, पण माई..."

"अरे, मी आहे ना इथे. माईला माझ्याकडे नेईन मी. २० दिवसाचा तर प्रश्न आहे. तशीही माई आताशा माझ्याकडे येत नाहीच. या निमित्तानी येईल. आणि तुम्हीही कुठेच गेला नाहीत रे मायाच्या लग्नानंतर. जा, जाऊन या. अगदी मनापासून सांगते."

"खरंच? पण आधी माईलाही विचारतो मी. ती ’हो’ म्हणली तरच जातो."

"विचार की. अरे माझ्याकडे मी नेतेय तिला म्हणल्यावर ती कशाला नाही म्हणेल रे?"
जयंतरावांना खूपच बरं वाटलं.

"तुला मी थॅंक्स तरी कसं म्हणू जयश्री?"

"अरे असं का बोलतोस? माझीही आईच आहे ना ती? तुम्ही वर्षानुवर्ष तिचं करताय. १५-२० दिवस मी केलं तर त्यात काय मोठंसं? अगदी नि:शंक मनानी कळव तू दादाला तुमच्या येण्याचं."

तरीही जयंतरावांनी माईंना विचारलंच.
"माई, मी आणि राधा दादा-वहिनीबरोबर गावाला जायचं म्हणतोय- सिंगापूरला- २० दिवस."

"हो का? कधीसं?"

"वेळ आहे माई अजून. २ महिने आहेत. पण बुकिंग आधी करावं लागतं ना. जयश्रीकडे राहाशील का माई तेवढे दिवस?"

"जयाकडे?" माई विचारात पडल्या. जुन्या वळणाच्या त्या. जावयाकडे राहाणं पटत नव्हतं. पण इलाज तरी काय होता? त्या परस्वाधीनच होत्या आता. सोबतीची गरज होतीच त्यांना. त्या गप्प बसल्या पाहून जयंतराव गडबडले. त्यांना वाटलं माईंना आवडलं नाही की काय?

"माई, जया आपणहोऊन म्हणाली की तुला नेईल तिच्याकडे म्हणून. नाहितर आपण बोलावूया का तिला इथे रहायला तितके दिवस?"

माईंना कळत होतं जयंता इतका अधीर का झालाय ते. दोघं बिचारे कुठेच गेले नव्हते किती वर्ष झाली. राधा बिचारी तर घर एके घर करायची सतत. त्यांच्यामुळे दोघही कसे बांधल्यासारखे झाले होते. त्यांनाही बदल करावा असं वाटलं तर बिघडलं कुठे असा विचार केला माईंनी..

"जयंता जा तुम्ही. मी राहीन जयाकडे. कळव तू दादाला तसं."

आपल्या मनातली इच्छा अशी झटकन पूर्ण होईल असं जयंतरावांना वाटलच नव्हतं. मग त्यांनी वेळ घालवला नाही. लगेचच दादाला कळवलं, योग्य रकमेचा चेकही पाठवून दिला. राधाताईही हरखल्या. तेच ते दिवसचे दिवस करून कंटाळा आला होता त्यांनाही. पण सासूची जबाबदारी होती त्यांच्यावर आणि त्या करायच्याही माईंचं मायेनी. माईंना त्यांची आणि त्यांना माईंची सवय झाल्यासारखी होती. माईंनी या वयात इतका समजूतदारपणा दाखवला याचं त्यांना खूप कौतुक वाटलं. पण आता रूटीन मधे बदल होणार म्हणून खूप बरंही वाटलं त्यांना. मनातल्यामनात खूप बेत सुरु झाले त्यांचे. नातवंडांसाठी कायकाय घ्यावं याची लिस्ट तयार झाली. मुलींना वरचेवर फोन करून मनातल्या शंका विचारत होत्या त्या. तसंच जयावन्संकडेही येणंजाणं चालू होतं. माईंना कायकाय लागेल, त्यांची औषधं, त्यांना एकदा डॉक्टरकडे नेऊन आणणं, तपासण्या करणं हे सुरु केलं त्यांनी.

बघता बघता २० दिवसच राहिले निघायला. त्या दिवशी राधाताई नेहेमीसारख्या उठल्या, दूधं तापवली तरी माईंची चाहूल नाही! वास्तविक माई पहाटे ५ पासूनच जाग्या असायच्या. राधाताईंना वाटले की झोप लागली असेल पहाटे, म्हणून त्या उठवायला गेल्या नाहीत. जयंतराव फ़िरायला गेले होते. ते ७ वाजता परत आले तरी माई झोपलेल्याच. राधाताई घाबरल्या. नको त्या शंकेनी दोघेही माईंच्या खोलीत गेले. पण माई अचेतन होत्या. झोपेतच कधीतरी त्यांचे प्राणोत्क्रमण झाले होते.

जयंतरावांना एकदम धक्काच बसला! राधाताई तर मटकन बसल्याच खाली. दोघांना पटकन काही सुधरेनाच!

पण शेजारचे जोशीकाका, काकू मदतीला धावले. त्यांनी डॉक्टरांना बोलावले. व्रुद्धापकाळामुळे माईंचं हार्टफेल झालं होतं! जयश्री आणि बाकी सगळे नातेवाईक जमले, दादा-वहिनीही ताबडतोब आले. अखेर सगळे सोपस्कार पार पडले.

४-५ दिवस झाले होते या घटनेला. दुपारची वेळ होती.. जयश्री आली घरी. सुदैवाने घरात या चौघांशिवाय कोणीच नव्हते हे पाहून जयश्रीला हायसंच वाटलं. तिला आज जे काही बोलायचं होतं त्यात बाहेरचे लोक नको होते तिला.

तिने आधी राधाताई आणि वहिनींना बाहेर बोलावलं. दादा आणि जयंतरावांच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह उमटलं.
"तुम्ही तुमच्या सिंगापूर ट्रिपचं काय करताय?" जयश्रीनी दादांना विचरलं. घरात ते मोठे, त्यामुळे निर्णय तेच घेणार होते.

"काय करताय म्हणजे? रद्दच झाली ती आता."

"कळवलंत का तसं टूर कंपनीला?"

"नाही, या गडबडीत कळवायचं राहिलं बघ. आत्ता लगेच कळवतो. अजून १५ दिवस आहेत. त्यांनाही आमच्या जागी कोणी नवीन लोक मिळतात का ते पहायला वेळ मिळेल. जयंता, तुझ्याकडे ते कागद पाठवले होते ना मी, ते दे. त्यावर असेल फोन नंबर त्यांचा."

"हे तुमचं ठरलच का म्हणजे?"

दादा एक मिनिट पहातच राहिले जयश्रीकडे. त्यांनी बाकीच्यांकडेही पाहिले. तिघेही तिच्याकडेच बघत होते.

"आता, ठरवायचं काय आहे त्यात? ठरल्यातच जमा आहे ते! माईचं हे असं झाल्यानंतर आम्ही ट्रीपला जाऊ का?"
वहिनी म्हणाल्या, "वन्सं, हे म्हणतात ते बरोबर आहे. आत्ता सगळ्यांनाच खूपच धक्का बसला आहे. ट्रिपला जायचा, फिरायचा उत्साह तर पाहिजे ना. आणि ते बरोबरही दिसणार नाही."

"बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते, आणि एरवी मी असे प्रश्न विचारलेही नसते. पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे... तुमचं जायचं ठरल्यानंतर मी आले होते एकदा घरी माईला सोबत म्हणून.. राधा-जयंता तुम्ही खरेदीला बाहेर गेला होतात तेव्हा. माई तेव्हा खूप गंभीर झाली होती.. मला म्हणाली ’माझ्यामुळे या मुलांना उगाच अडकून पडल्यासारखं होतं. मला फार अपराधी वाटतं याबद्दल. आता हौसेनी हा घाट घातला आहे, तर तो धड पार पडूदे. माझं मधेच काही आजारपण उद्भवलं नाही म्हणजे मिळवली. राधा-जयंता किती दिवस झाले कुठे गेले नाहीत. बांधून घातल्यासारखे झालेत उगाच.. मुलांची ही ट्रिप निर्विघ्नपणे पार पडूदे हीच प्रार्थना करते जया आता. अजून देवानी आयुष्य तरी किती दिलंय कोण जाणे. माझा सगळ्यांना किती त्रास होतो गं, लवकर सुटकाही होत नाही. सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या..देवानी लवकर सोडवावं आता यातून..’"

जयश्रीला सांगता सांगताच दु:खाचे कढ आले. सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी होतं.

थोडं सावरून जयश्री पुढे म्हणाली, "म्हणूनच तुमच्याशी बोलायला मुद्दाम आले मी आत्ता. मला माहित होतं की तुम्ही या परिस्थितीत गावाला जायचा विचारही करणार नाही. पण ’तुम्ही जा’ असं आवर्जून सांगायला आले मी. माईची शेवटची इच्छा म्हणून तरी.. तिच्या इच्छेचा मान राखा. तिला मनापासून वाटत होतं की तुम्ही जाऊन यावं, कोणत्याही कारणानी त्यात विघ्न येऊ नये.. तिच्यामुळे तर अजिबात नाही.. एक पूर्ण समधानी आयुष्य जगली ती.. आणि मृत्युही अगदी सुखानी आला तिला. तिच्यासाठी शोक करू नका. मोकळ्या, खुल्या मनानी ट्रिपला जा, फिरून या. आणि लोकांची, नातेवाईकांची.. ते काय म्हणतील याची चिंता करू नका. ते माझ्यावर सोडा. माईचे दिवस झाल्यावरही थोडे दिवस आहेत मधे, तोवर आपण सगळेच सावरू. तुम्ही फिरून आलात की या दु:खाचा विसर पडायला मदतच होईल. दादा, बरं झालं तू टूर कंपनीला फोन नाही केलास ते."

चौघही विचारात हरवले. माईला ही अशी सुटका हवी होती अशी कल्पनाही नव्हती त्यांना. मुळात तिचं बंधन असं वाटलं नव्हतं कधीच.. पण माईंना मात्र कंटाळा आला होता. आपला संसारात काहीच उपयोग नाही, मग आपण जगतोय तरी कशाला? मुलं प्रेमानी करत आहेत, पण किती वर्ष त्यांच्याकडून सेवा करून घ्यायची? तीही साठीच्या पुढेमागे होती आता. या वयातही केवळ आपल्यामुळे त्यांच्या जगण्यावर बंधन येत आहे हे सहन होत नव्हतं त्यांना. एकटा मृत्युच काय ती आपली सुटका करेल या सगळ्यातून.. फक्त आपलीच नाही तर मुलांचीही.. बहुदा काळाने माईचे विचार ऐकले होते...

पण आपली खरच सुटका झाली आहे का? आणि त्याचा आनंद मानावा की दु:ख? हे चौघांनाही समजेना. माईच्या आठवणींमुळे सगळ्यांच्याच डोळ्यात अश्रू होते.

समाप्त.

(ही या ब्लॉगवरची पहिली कथा!
बाकी सर्व कथांना पूर्वप्रसिद्धी मिळाली आहे.)

8 comments:

Tulip. said...

heyy Poonam woww!! Abhinandan!!
mala mahit ch nahi blog ughadala ahes. sahie. lihi ata mast katha. ani itar hi. class jhalay blog design.
lihit raha nehmi pramanech sunder.

कोहम said...

chaan aahe goshta....

fakta ek suggestion. jar mothe lekh kimva katha split karun don bhagat publish kelya tar jasta loka shevataparyanta vachu shakatil..

he katha chaan aahe matra

S said...

Uttam katha.

S said...

Uttam katha.

मल्हारी said...

सुटका चटका लावून जाणारी आहे.

vivek said...

Chhaan aahe katha. Very touching.

श्यामली said...

सुंदर कथा ग...

Vidya Bhutkar said...

Chaan lihites tu. Katha avadali khup javalchi vatli.

This is similar one to ours. Aplyakade manus gelyanantar ek varsh kahi festival celebrate karat nahit. Pan majhe ajoba gelyanantarhi magachya varshi amhi diwali keli. Karan tyanch je kahi karaycha te aaj paryant sarv neet kela hota aani tyanchi purnapane kalajihi ghetli hoti. Pan asa asunahi diwalila tyanchi athavan jhalyashivay rahili nahi.
-Vidya.